Maharashtra ST Bus Service Suspended To Karnataka : कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी बस चालकावर हल्ला झाल्याने महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा (Maharashtra ST Bus) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
कर्नाटकमध्ये एसटी चालकावर हल्ला
शुक्रवारी रात्री चित्रदुर्ग येथे काही कन्नड समर्थकांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बस चालकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चालकाच्या तोंडाला काळ फासल आणि त्याला मारहाण केली. चालकाला “कन्नड भाषा बोलता येते का?” असा प्रश्न विचारण्यात आला आणि नंतर त्याला लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र सरकारची भूमिका
Karnataka Bus Attack: या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी त्वरित निर्णय घेतला. कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
“हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!” – सरनाईक यांचा थेट इशारा
या घटनेनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर शब्दात कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. “गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे योग्य नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, मंत्री नंतर,” असे त्यांनी ठणकावले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी यावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाषावादामुळे तणाव
या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. चित्रदुर्ग हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये काही मराठी कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. यामुळे दोन्ही राज्यांतील संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील निर्णय कधी?
सध्या एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क आहे. कर्नाटक प्रशासनाने योग्य कारवाई केल्याशिवाय एसटी बससेवा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र सरकारचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.