मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५: Maharashtra SSC Exam Paper Leak News 2025 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिका फुटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी (प्रथम भाषा) पेपरच्या वेळी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात पेपर फुटीच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, शिक्षण मंडळाने या दाव्यांचे खंडन केले आहे.
जालना जिल्ह्यातील पेपर फुटीची वस्तुस्थिती
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी काही माध्यमांमध्ये आली होती. मात्र, शिक्षण मंडळाने याची चौकशी केल्यानंतर आढळले की, व्हायरल झालेली पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नव्हती. त्या खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील काही पाने आणि हस्तलिखित नोट्स होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यवतमाळमध्येही पेपर फुटीचा दावा खोटा
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी परीक्षा केंद्रांवरही मराठी प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल झाल्याची बातमी आली होती. शिक्षण मंडळाने याबाबत अहवाल मागवला असता, प्रश्नपत्रिका फुटल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र, चुकीच्या हेतूने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे आढळले आहे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पालकांच्या गर्दीमुळे अफवा पसरली
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका परीक्षा केंद्राबाहेर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.
शिक्षण मंडळाचा इशारा
शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
🔴 हेही वाचा 👉 एसटी प्रवासात महिलांना मिळणारी ५०% सवलत बंद होणार? एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका.